उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु होते. या नाटकाचा शेवट मात्र अतिशय अनपेक्षित झाला. शेवट असाही धक्कादायक असू शकतो, याची दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित स्पष्ट कल्पना नसावी. मात्र दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व धुरंधर राजकारणी अमित शहा यांनी फासे टाकले व एका डावात अनेक तीर मारले व ते सध्यातरी यशस्वीरीत्या लागल्याचेही दिसून येते.
अमित शहा हे भारताच्या पंतप्रधान पदासाठी दावेदार मानले जातात. मोदी यांच्यानंतर शहा यांच्याकडे याबाबत पहिले जाते. शहा यांच्यासारखेच देवेंद्र फडणवीसही या शर्यतीत आहे. या दोघांकडेही पंतप्रधान पदासाठी लागणारे बरेचशे गुण व धमक आहे. फडणवीस तर शहा यांच्यामानाने वयाने तरुण आहेत. त्यामुळे साहजिकच मागील ७ ते ८ वर्षांपासून शहा यांनी फडणवीस यांना पक्षांतर्गत शह दिला असल्याचे दिसून येते.
याच शह – काटशहाचा भाग म्हणून अमित शहा यांनी फडणवीसांसारख्या मुत्सुद्दी व धुरंधर राजकारण्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून सन २०१९ व आता लांब ठेवले आहे. आजही त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची पोस्ट देऊन डिमोशन केले. यातूनच त्यांचे खच्चीकरण करण्याचे शहा यांचे षडयंत्र दिसून येते. वास्तविक फडणवीस यांना संघाचा पाठींबा आहे, मात्र त्यालाही मोदी – शहा जोडगोळी जुमानत नसल्याचे दिसून येते.
आजच्या या अपमानामुळे फडणवीस आतून निराश आहेत. आज तेच नैराश्य त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून थोड्याफार प्रमाणात जाणवतही होते. मात्र फडणवीस हे उत्कृष्ट अभिनेतेही आहेत. कितीही संकट समोर दिसले, तरी शरद पवार यांच्यासारखेच ते वागतात. त्यांचा चेहरा किंवा बॉडी लँग्वेज जराही बदलत नाही.
( विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व मुंबई बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण दरेकर यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे, मात्र त्यावेळी फडणवीस यांच्यातील कलाकार जागा व्हायचा, अशावेळी ते दरेकर हे राजा हरिश्चंद्राचेच अवतार असल्याचे ठासून सांगायचे ).
आज फडणवीस यांची अवस्था मात्र ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’, अशी आहे. सध्या ते “वेट अँड वॉच”च्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या सकारात्मक राजकारणात फारसे सक्रिय न राहता, योग्य संधीची वाट पाहत बसतील. त्यांनी जे शरद पवार यांच्यासारखे पेरले आहे, तेच उगवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मुंबई व इतर महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत, या निवडणुकांत प्रस्थापित शिवसेनेला शह देण्यासाठी शहा यांनी हे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांची सहानुभूती मिळावी व त्यांचा रोष कमी व्हावा, हाही त्यामागे उद्देश आहे. अर्थात हा त्यांचा उद्देश तितकासा यशस्वी न होण्याची शक्यता अधिक आहे, कारण ‘ठाकरे’ आडनावाशिवाय शिवसेना, हे समीकरण शिवसैनिक कदापि सहन करणार नाही.
बाळासाहेबांच्या मुलाला या फुटीर मुख्यमंत्री व आमदारांमुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, हा डाग शिवसैनिक विसरण्याची शक्यता फारच कमी आहे.