‘टॉपर विद्यार्थी आपलेच’ असल्याचा दोन्ही क्लासेसचा दावा
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
परीक्षांचे निकाल लागले की पालकांसह विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी चक्क ‘आमचेच विद्यार्थी टॉपर’ असे चक्क खोटे दावे करायचे, त्यासाठी प्रसारमाध्यमांतून लाखो रुपयांच्या जाहिराती करायच्या व पालकांसह विद्यार्थांकडून दाम दुपटीने शुल्काच्या रूपात काळी माया गोळा करायची, असा गोरखधंदा सध्या महाराष्ट्रात चालू आहे.
भारतात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा – नीट ( NEET- National Eligibility Cum Entrance Test ) या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. या परीक्षेत महाराष्ट्रातील आदित्य केंद्रे, श्रुती वीर, पारस सूर्यवंशी या तीनही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. हे तिन्ही विद्यार्थी महाराष्ट्रातील शिवराज मोटेगावकर यांच्या RCC व दशरथ पाटील यांच्या IIB या क्लासेसचे विद्यार्थी होते, असा दावा या दोन्ही क्लासेसने केला आहे.
एकाच वेळी दोन्ही क्लासेसने हा परस्परविरोधी खोटा दावा केला आहे. यामुळे पालकांसह विद्यार्थीही संभ्रमात पडले आहेत, या दाव्याची शहानिशा करण्यासाठी ‘स्प्राऊट्स’च्या प्रतिनिधीने या दोन्ही क्लासेसच्या प्रतिनिधींना संपर्क साधला असता, त्यांनी हे ३ विद्यार्थी त्यांचेच असल्याचा पुन्हा दावा केला आहे. यावर ‘स्प्राऊट्स’च्या प्रतिनिधीने, हे पुरावे mail करण्यास सांगितले असता, ते पाहण्यासाठी त्यांच्या क्लासेसला भेट द्या,असेही या दोन्ही क्लासेसच्यावतीने सांगण्यात आले. या दाव्याच्या पुष्टीसाठी या विद्यार्थ्यांना संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.
प्रसारमाध्यमांची अविश्वासार्हता
RCC क्लासेसने ११ सप्टेंबर रोजी सकाळ, लोकमत, पुढारी, दिव्यमराठी, प्रजावाणी या अंकात पहिल्या पानावर पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. तर IIB या क्लासेसने त्याच दिवशी दैनिक पुण्यनगरी व इतर वृत्तपत्रांत हाच दावा करीत पानभर जाहिराती दिल्या आहेत. एकाच दिवशी या दोन क्लासेसने हा परस्परविरोधी दावा केला आहे. त्यासाठी लाखो रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. त्यामुळे या क्लासेसच्या निराधार दाव्यासह प्रसारमाध्यमांची विश्वासार्हताही पैशापुढे विकली गेल्याचे आढळून येत आहे.
“महाराष्ट्रातील ३ टॉपर विद्यार्थ्यांनी एकाच अभ्यासक्रमासाठी एकाच वर्षी दोन क्लासेसला प्रवेश घेणे, हे सपशेल खोटे आहे. त्यामुळे पालकांसह हजारो विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणावर दिशाभूल केली जात आहे. त्यांच्या भवितव्याशी खेळ खेळण्याचा हा क्रूर प्रकार आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेवून या दोन्ही क्लासेसच्या संचालकांवर भारतीय दंड विधान ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.”
अधिवक्ता दिलीप इनकर
सामाजिक कार्यकर्ते