उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

 

‘नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग’ प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. मागेही याच प्रकरणात राहुल गांधी यांची सलग सहा दिवस चौकशी करण्यात आली होती. ज्या नॅशनल हेराल्ड वरून गांधी कुटुंबियांवर हे सावट पसरलेले आहे. त्याबद्दल काँग्रेसच्या नेतेमंडळींना काहीही वाईट वाटत नाही, ही या राष्ट्रीय पक्षाची शोकांतिका आहे. 

खरे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन १९०८ च्या पूर्वी या वृत्तपत्राची स्थापना केली होती. एकेकाळी ते काँग्रेसचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध होते. 

खऱ्या  अर्थाने काँग्रेस पक्षाचा हा वारसा आहे.  मात्र सध्या या वृत्तपत्राची अवस्था ही काँग्रेस पक्षाइतकीच दयनीय आहे. महाराष्ट्रात १४ नोव्हेंबर २०२१ रोजी या वृत्तपत्राची मुंबई आवृत्ती सुरु झाली. त्याला आजमितीला ८ महिने पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या मुंबईतील आवृत्तीबद्दल काहीही माहित नाही. 

मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात महविकास आघाडीची सत्ता होती. त्यात काँग्रेसचा महत्वाचा सहभाग होता. मंत्रिमंडळात ४ कॅबिनेट मंत्री होते. मात्र तरीही या वृत्तपत्राच्या मुंबईतील आवृत्तीला कुठल्याही नेता किंवा मंत्र्याने सढळ हाताने मदत तर सोडा, पण साधी वर्षभराची वर्गणीही भरलेली नाही, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे. आज हे वृत्तपत्र साप्ताहिक स्वरूपात पैशाअभावी अत्यंत दयनीय अवस्थेत चालू आहे. 

वास्तविक साप्ताहिक चालवायला असा कितीसा खर्च येणार आहे, मात्र तोही खर्च करण्याची दानत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडे नाही.

जी अवस्था या वृत्तपत्राची, तीच अवस्था महाराष्ट्रातील काँग्रेसची. भारतात ‘गांधी’ व महाराष्ट्रात ‘ठाकरे’ नावावर येथील नेत्यांनी सात पिढ्या खाऊन उरेल एवढी काळी माया जमवली. मात्र पक्षावर वाईट दिवस येताच, नेतेही फिरले. बाळासाहेब विखे पाटील, कृपाशंकर सिंह, नारायण राणे यांसारख्या भ्रष्ट नेत्यांनी भाजपची वाट धरली; त्यात त्यांचा काळा पैसाही पांढरा झाला.

आज जे काँग्रेसमध्ये आहेत, त्यातील एखादा अपवाद वगळता सर्वांनीच स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. मात्र पक्ष अडचणीत असताना कोणीही पक्षाला आर्थिक मदत करीत नाही. काही जण ईडीला घाबरतात. तर काही ईडीचे निमित्त करून शांत राहतात. 

आज पक्षाला महाराष्ट्र पातळीवर सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नाना पटोलेंसारखे नेता जरी आक्रमक असला, तरी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते, त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे त्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल काही कार्यकर्त्यांच्या मनात साशंकता आहे. शिवाय त्यांचे भाजपचे महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री, नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतंर्गत असलेले मधूर संबंधही सर्वानाच ठावूक आहे. 

*पटोले यांच्याबरोबर आणखीही काही त्यांच्यापेक्षा सवाई नेते काँग्रेसमध्ये आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित विलासराव देशमुख, यशोमती ठाकूर असे काही नेते आहेत. या सर्वच नेत्यांनीही प्रचंड प्रमाणात ‘कमावले’. मात्र पक्षासाठी ते काहीही करायला तयार नाहीत. त्यांचा तालुका, जिल्हा व सहकारी बँका यांच्यापुढे त्यांना संपर्कही ठेवण्याची गरजही  वाटत नाही.  आज यांचे अस्तित्व हे फक्त प्रसार माध्यमांसमोर येवून मुळमुळीत बोलण्यापुरते मर्यादित आहे. यातूनच हे नेते दिवसेंदिवस अधिकाधिक मोठे होत आहे, मात्र पक्षाची अवस्था आणखी बिकट होत आहे.