उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील अमित शहा आहेत. त्यांनी शिवसेनेत पद्धतशीरपणे फूट पाडली. ही फूट पूर्वनियोजीत होती. यामध्ये मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर ज्येष्ठ नेते सुगावा लागूनही बेफिकिरीने राहिले. त्यामुळे लवकरच आता फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

खरंतर शिंदे व फडणवीस यांचे आर्थिक संबंध हे ‘समृद्धी जीवन महामार्गा’वरून अधिकाधिक घट्ट होत गेले. त्यानंतर मग लगेचच एमएसआरडीचे व्यवस्थापकीय संचालक, महाभ्रष्ट राधेश्याम मोपलवार यांना निवृत्तीनंतर सलग ३ वेळा मुदतवाढ देण्यात आली. या महामार्गामुळे या सर्वांचीच आर्थिक ‘समृद्धी’ मोठ्या वेगाने झाली व स्थानिक शेतकऱ्यांची मात्र दुर्दशा झाली.

मागील काही महिन्यांपासून ‘मला विचारल्याशिवाय शिंदे यांच्या फाईल्स क्लिअर करू नका’ असा सज्जड दम दस्तरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी आणि मोपलवार यांना दिला. त्यामुळे नगरविकास मंत्री शिंदे अधिक अस्वस्थ झाले होते.

त्यातच फडणवीस यांनी केंद्र सरकारमार्फत शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे त्यांचे सचिव सचिन जोशी व संबंधित बिल्डरला ‘इडी’ची नोटीस पाठविली. त्यामुळे धास्तावलेल्या शिंदे यांनी फडणवीस यांना शरण जायचा निर्णय घेतला. त्याआधी ‘इडी’ची कारवाई सुरु झाल्याने खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव व त्याच्या पत्नी आमदार यामिनी जाधव व त्यांच्यासारखे ‘इडी’पीडित लोकप्रतिनिधी अगोदरच शुद्धीकरणासाठी भाजपच्या वाटेवर जायला तयार होते.

फडणवीस हे मोदी व शहा त्यांच्यासारखेच कसलेले धूर्त राजकारणी आहेत. शिवसेनेत सामील होताना रिक्षा, पानटपरी चालवणाऱ्यांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी गोळा केली, याचा फडणवीस यांनी व्यवस्थित अभ्यास केला होता. जोडीला किरीट सोमैयाही होतेच, याशिवाय मोपलवारांसारखे असंख्य मोठमोठे आयएएस, आयपीएस अधिकारीही फडणवीसांना इत्यंभूत माहिती पुरवत होते. त्यामुळे हे बडे महाभ्रष्ट मासेही फडणवीस यांच्या गळाला लागले. यापैकी ज्या काही आमदारांनी फारशे कमावलेले नव्हते, त्यांना फडणवीस यांनी ५० कोटी व मंत्रिपदाचे अमिश दाखवले व आपले ‘मी पुन्हा येईन’चे सोपं साकार केले.

खातेवाटपावरून नाराजी:
देवेंद्र फडणवीस यांनी या शिवसेनेतील फुटीर आमदारांना सुरुवातीपासूनच गोड बोलून ताब्यात ठेवलेले आहे. ‘आम्ही देवू तीच खाती तुम्हाला घ्यावी लागतील’, यावर फडणवीस ठाम असल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’ला मिळाली आहे . भाजप मुख्यमंत्र्यांसह २८ मंत्रिपदे आपल्याकडे घेणार आहे तर बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाला उपमुख्यमंत्रीपदासह १० ते १२ मंत्रिपद देण्याचा फॉर्म्यूला ठरल्याचे समजते. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदासह नगरविकास आणि महसूल अशी मलईदार खाती मागितली आहेत. मात्र, भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ किंवा महसूल यापैकी एकच खाते देण्याची तयारी दर्शवली आहे.