संत्रा बर्फीमध्ये संत्रीच नाही

उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स विश्लेषण नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत आणि तिथली ‘हल्दीराम’ची उत्पादनेही. पण या प्रसिद्धीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना चूना लावण्याचा उद्योग हल्दीरामने सुरु केलाय. नागपूरची संत्रा बर्फी म्हणून हल्दीराम जो काही पदार्थ विकत आहे, त्यात संत्री नाहीच. चकचकीत बॉक्सवर ऑरेंज बर्फी असे ठसठशीत लिहिलं असलं तरी प्रत्यक्षात घटक पदार्थ (ingredients) तपासून पाहिले तर ऑरेंज पल्पचे प्रमाण फक्त २ टक्के आहे. बाकी निव्वळ साखर, कोहळा आणि घातक रसायने. आणि वर मुजोरी इतकी की This is only a brand name or trade mark and does not represent its true nature. (हे फक्त ब्रँड नाव किंवा ट्रेडमार्क आहे आणि त्याचे खरे स्वरूप दर्शवत नाही.) असं एका कोपऱ्यात इंग्रजीत छापून दिलंय. दुकानांच्या पाट्या स्थानिक भाषेत हव्यात म्हणून आग्रह होतो, पण कंपन्यांना हा नियम लागू नाही. अर्थातच अर्ध्याहून अधिक लोकांना त्यांनी नक्की काय खाल्लं ते माहित नाही. ज्या नावाने पदार्थ विकला जातो आहे, तोच पदार्थ ग्राहकांना मिळायला नको का? संत्रा बर्फी म्हणून कोहळ्याचा पदार्थ कसा काय विकला जाऊ शकतो? नारळ पाणी म्हणून ट्रेड मार्क घेऊन दारू विकली तर चालेल का? मग हल्दीराम सारख्या बड्या धेंडांचे असले उद्योग भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कसे काय चालवून घेते? यांना fssai लायसन्स मिळतेच कसे? कोणत्याही पदार्थात नारंगी पिवळा (Sunset Yellow INS 110) सारखा घातक रासायनिक रंग मिसळून, नागपूरच्या संत्र्याचा आव आणता येतो का? या रंगावर नॉर्वे, फिनलॅन्ड, स्वीडन सारख्या देशांत २००० सालापासून बंदी आहे. २००८ पासून युकेमधील कंपन्यांना या रंगाचा वापर मर्यादित करण्याच्या आदेश दिला गेला. आणि आज २०२२ मध्येही ऍलर्जी, किडनी ट्युमर, मायग्रेन, पोटदुखी, हार्मोनल प्रॉब्लेम्स सारख्या आजारांना कारणीभूत असणारे हे रसायन ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी राजरोस वापरले जाते. हल्दीराम सारखा ब्रँड फसवणूक करतोय, त्यांच्यावर कारवाई कोण करणार? याबाबत प्रतिक्रियेसाठी हल्दीरामच्या व्यवस्थापनाला संपर्क साधला असता, होवू शकला नाही.