उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक कोकणवासियांनी ठाम विरोध दर्शवला आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने चक्क या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनाच तडीपारीच्या नोटिसेस पाठवलेल्या आहेत, याउलट पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी व त्याच्या कंपूतील भूमाफियांवर ३ ते ४ एफआयआर होवूनही त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती, अशी धक्क्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
रत्नागिरी येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पासाठी Ratnagiri Refinery And Petrochemicals Limited(RRPCL ) या कंपनीला सर्व्हे करायचा होता. मात्र हा सर्व्हे करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी लागते. याशिवाय इतरही अटींची पूर्तता करावी लागते. मात्र यापैकी कोणतीही परवानगी न घेता किंवा अटींची पूर्तता न करता या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला, त्याला गावकऱ्यांनी ठाम विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या RRPCL च्या प्रशासनाने पोलिसांना हाताशी धरुन या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याचे आढळते. इतकेच नव्हे तर सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे अशी थातुरमातुर करणे दाखवत, प्रमुख कार्यकर्त्यांनाच चक्क तडीपारीच्या नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत.
RRPCL या कंपनीने केलेला हा सर्व्हे बेकायदेशीरपणे केलेला होता, अशी माहिती RTI मधून मागविण्यात आलेल्या कागदपत्रांतून पुढे आलेली आहे. या नियमबाह्य सर्व्हेच्या माध्यमातूनच काही तकलादू कारणे तयार करण्यात आली व त्याआधारे नोटिसेस पाठविण्यात आल्या, अशी माहिती स्प्राऊट्सच्या इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
भूमाफिया पंढरीनाथ आंबेरकर याने मयताच्या वारसाचे बोगस प्रतिज्ञापत्र बनवून अनेक ठिकाणी जमिनी विकलेल्या आहेत, याचीही माहिती स्प्राऊट्सच्या टीमने जमा केलेली आहे. आंबेरकर हा बेकायदेशीर जमिनी विक्री करण्यात प्रवीण होता. त्यानंतर १ वर्षांपूर्वी त्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनतर त्याने हा गोरखधंदा अधिक जोमाने चालू केला होता.
आंबेरकर याच्यासह अभिजित गुरव, संकेत खडपे, राजा काजवे, सुनील राणे, विनायक कदम, अशपाल हाजू, पुरुषोत्तम खांबल, नंदू चव्हाण, गौरव परांजपे, सौरव खडपे हे स्थानिक भूमिपुत्रांना धमकावतात व त्यांच्या जमिनी बळकावतात. त्यामुळे ग्रामस्थांनी यांच्याविरोधात तक्रारीही केलेल्या आहेत. यापैकी काही जणांवर एफआयआर देखील झालेले आहेत, मात्र राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असते. वास्तविक पोलिसांनी या दबावाला झुगारून जर वेळीच कारवाई केली असती, तर शशिकांत वारिशे यांची हत्या टळली असती.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व प्रमुख आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांचा एकत्रित फोटो शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. हा फोटो व त्यामधील ओळींमधून या हत्येतील मास्टरमाइंड हा सामंत होते, असे सूचित होते. याविषयी सविस्तर बातमी ‘स्प्राऊट्स’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केली. त्यानंतर सामंत यांनी तात्काळ वरिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत द्यायची घोषणा केली. वास्तविक ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणे अपेक्षित होते. मात्र सामंत यांनी ही घोषणा केली व स्वतःची अब्रू वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.