उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स विश्लेषण

पीएचडी म्हणजे तशी मानाची पदवी. पण आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अशा पदव्यांचा बाजार चालू आहे. विषयाचा गंधही नसलेले महाभाग डॉक्टरेट म्हणून मिरवत आहेत. तरीही अशा बोगस पदव्यांचा लिलाव मांडणाऱ्या एकाही संस्थेवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही.

भारतात पीएचडी प्रदान करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची (यूजीसी) मान्यता लागले. ही मान्यता केवळ ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या विद्यापीठांनाच मिळते. स्वयंसेवी संस्थांना पदवी दान करण्याचा अधिकारच नाही. तरीही दरवर्षी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांत समारंभपूर्वक पीएचडी दिली जाते. काळी कॅप आणि गाऊन घालून फोटो काढले जातात. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो. यूजीसी मात्र या सगळ्या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते.

बोगस विद्यापीठांचे मालक सगळीकडे अर्थपूर्ण संबंध राखून असतात. त्यामुळे गुन्हा दाखल व्हायचा प्रश्नच नसतो. म्हणूनच तर थेट राजभवनातच बोगस ऑनररी पीएचडी वाटप होते. ‘स्प्राऊट्स’ने हा विषय लावून धरला म्हणून किमान चर्चा तरी झाली. पण अजूनही राजभवनात बेकायदेशीरपणे ठिय्या मांडून बसलेले भ्रष्ट अधिकारी उल्हास मुणगेकर, अवैध पदवीदान करणाऱ्या संस्थेचे आयोजक अरविंद देशमुख, मणिलाल शिंपी यांची साधी चौकशीही झालेली नाही.

यूजीसी ऍक्टनुसार, परदेशी विद्यापीठांनाही भारतात पीएचडी देण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. किंवा युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असावे लागते. मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसवून परदेशी विद्यापीठांचे मालक व त्यांचे भारतातील दलाल प्रत्येकी लाख ते दीड लाख रुपये घेवून बोगस पीएचडी वाटतात. आणि अशा पदव्या विकत घेणारे आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत असल्याचे भासवून गल्ल्लीत धंदा थाटतात. कुठलेतरी सटरफटर कोर्स चालवून गरजू, भोळ्या-भाबड्या लोकांना हजारोंचा चुना लावतात.

मानद पदवी हा अजून एक गंमतीशीर प्रकार. प्रबंध नको की परीक्षा नको. पण याचेही काही निकष असतात. मानद पदवी फक्त निवडक मान्यताप्राप्त विद्यापीठे देऊ शकतात. ज्यांनी एखाद्या क्षेत्रात असाधारण कर्तृत्व गाजवले आहे, त्यांनाच ही पदवी दिली जाते. पण कागदावरच अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांना त्याचे काय? गल्लीतला तथाकथित समाजसेवकही लाख रुपये मोजून मानद पदवी मिळवतो. कथित अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर, नित्यानंद स्वामी यांनाही अशाच प्रकारे फेक पीएचडी घेण्याचा मोह टाळता आला नाही, याबाबतीतही स्प्राऊट्सनेच सर्वप्रथम आवाज उठवला होता. कथित मोटिव्हेशनल गुरु विवेक बिंद्रा यांनीही Open International University for Complementary Medicines (Colombo) या फेक विद्यापीठातून ऑनररी पीएचडी घेतली आहे. स्नेह देसाई यांनीही तेच केले.

रायगड, महाराष्ट्रातील एका अध्यात्मिक गुरूंचीही अशाच प्रकारे बोगस पीएचडी देवून फसवणूक करण्यात आली. खरंतर त्यांचे कार्य मोठे, पण कदाचित नियम माहित नसल्याने ते या जाळ्यात फसले. बोगस विद्यापीठांनाही अशी मोठी नावे हवीच असतात. कारण त्यांचे नाव पुढे करून इतरांची फसवणूक करता येते. चेन सिस्टीम चालू राहते. त्यामुळे प्रत्येकानेच सावध राहण्याची गरज आहे.

यूजीसीने आपल्या वेबसाईटवर बोगस डिग्री, पीएचडी देणाऱ्यांची लिस्ट जाहीर केली आहे. त्यात केवळ २२ विद्यापीठांचीच नावे आहेत. प्रत्यक्षात अशा शेकडो संस्था व विद्यापीठे आजही खुलेआम हा गोरखधंदा करत आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.