कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूने दहशत माजवली असतानाच ज्या महापालिकेच्या रुग्णालयावर सर्वसामान्यांचा भरोसा असतो त्याच केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी निविदांच्या माध्यमातून मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला असून कोरोना रुग्णांसाठी हजारो निकृष्ट दर्जाच्या गाद्या मागविण्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर ही बाब उघड झाल्यानंतर याच गाद्यांची पालिकेच्याच डम्पिंग ग्राऊंडवर गुप्तपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. या भयंकर प्रकारामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून आलेल्या कराच्या पैशाची पालिकेच्या अधिकार्यांकडून विल्हेवाट लावली जात असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

केईएमचे विद्यमान अधिष्ठाता हेमंत देशमुख हे वर्षअखेरीस ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीरक्षण खात्यामार्फत निविदा काढून टक्केवारीतून मिळेल तो माल आपल्या खिशात घालण्याची घाई त्यांना झाली आहे. याच घाईतून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी एक हजार गाद्या मागविल्या खर्या. पण त्या गाद्याच निकृष्ट निघाल्याची बोंब झाल्याने या गाद्यांची विल्हेव्हाट लावण्याचीही सोय त्यांनी केली. आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांनी गाद्यांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रदीप नेमाडे आणि डॉ. अनिता काळे यांना दिल्या.

८ टेम्पो गाद्यांची आठवडाभर वाहतूक

एक हजार गाद्यांसाठी टेम्पोला आठ वेळा वाहतूक करावी लागली. विशेष म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी वाहतूक होत असलेला जोहरा टेम्पो सर्व्हिसचा टेम्पो सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. १८ ऑक्टोबरपासून या गाद्यांची वाहतूक करून त्यांची महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये विल्हेवाट लावण्यात आली.

देशमुखांच्या गैरकारभाराची चौकशी करा

देशमुखांनी माजवलेल्या या अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी समाजसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे. निवृत्त होण्याआधी पालिका आयुक्तांनी त्यांची चौकशी लावावी. त्यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा ६ डिसेंबर रोजी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्राणांतिक उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे.