उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
छत्रपती शाहू महाराज यांनी जेजुरी येथील ‘खंडोबा’ देवाच्या मंदिराला इनाम म्हणून जागा दिलेली होती. या पवित्र जागेवर मंदिराच्या देखभाल करणाऱ्यांनी चक्क ‘बिअर बार’ उघडलेला आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावात खंडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळावे म्हणून आतापर्यंत देवस्थानाला २५० हून अधिक एकर जमिनी दानस्वरूपात मिळालेल्या आहेत.
रोजमारा (प्रसादरुपी धान्य ) वाटप व पूजाअर्चा करण्यासाठी उत्पन्न मिळावे, यासाठी दस्तरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराला काही जमीन दान केली. ही जागा अध्यात्मिक हेतूने दिली होती. या जागेच्या उत्पन्नातून प्रसाद व देवस्थानच्या देखभालीचा खर्च भागविण्यात यावा, हा महाराजांचा उदात्त हेतू होता.
याच जमिनीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ( son of Chhatrapati Sambhaji and maharani Yesubai, Satara,dynasty ) दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ‘मल्हारतीर्थ’ या नावाने पवित्र कुंड उभारले. या कुंडाशेजारी ‘लक्ष्मीतीर्थ’ नावाचे कुंड देखील आहे. या ऐतिहासिक कुंडात स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
अशा या पवित्र जमिनीची देखभाल पूर्वीपासून पेशवे पाहत होते. आजही त्यांचे कथित वंशज म्हाळसाकांत पेशवे जेजुरी गावात राहत आहेत. मात्र पैशाच्या अतिहव्यासामुळे त्यांनी या जागेवर चक्क ‘बिअर बार’ टाकलेला आहे. त्यामुळे दररोज येथे मद्यपी दारु ढोसत असल्याचे चित्र बघायला मिळते.
देवस्थानच्या जागेवरील या बिअर बारमुळे दिवसभर येथे तळीरामांची वर्दळ असते, त्यामुळे देवस्थान व पवित्र कुंडाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देवस्थानाची विटंबना होत आहे. याशिवाय देवस्थानाला छत्रपतींनी दिलेल्या जागेचा हा गैरवापर आहे. त्यामुळे हा बिअर बार त्वरित बंद करण्यात यावा, व दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. मार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त नंदा राऊत व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कदम यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केलेली आहे.
अशी आहे आख्यायिका:
महाराजांनी दिलेल्या जागेवर आजही ऐतिहासिक पवित्र कुंड आहे. या कुंडातील पाणी पवित्र मानले जाते. या कुंडातील पाणी घेवून ते पेशव्यांनी शेतात टाकावे. त्यातून उत्पन्न होणारे धान्य हे भाविकांना ‘रोजमारा’ (प्रसादरुपी धान्य ) म्हणून वाटावे. हे धान्य घरोघरी गेल्यामुळे भाविकांच्या घरी लक्ष्मी नांदते, अशी आख्यायिका आहे, आज याच पवित्र कुंडाशेजारी हा बिअर बार उघडण्यात आलेला आहे.
पेशवे असली आहेत काय?
आजमितीला पेशवे यांचे वंशज म्हणवणारे त्यांचे खरोखरीच वंशज आहेत काय, याविषयी ‘स्प्राऊट्स’च्या टीमला शंका आहे. याबाबत म्हाळसाकांत पेशवे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.