शिक्षणमाफिया लल्लन तिवारींच्या कॉलेजवर एसीबीची धाड

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स EXCLIUSIVE

स्वयंघोषित शिक्षणसम्राट व कथित भाजपचे कार्यकर्ते लल्लन तिवारी यांच्या आर्किटेक्ट कॉलेजवर अँटी करप्शनने नुकतीच धाड टाकली. त्यावेळी त्यांनी ४ जणांना अटकही केली. याप्रकरणी सखोल चौकशी केल्यास तिवारी यांनाही अटक होवू शकते, मात्र राजकीय वरदहस्त असल्याने हे प्रकरण ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक आहे.

तिवारी हे अनेकदा राजकीय पुढाऱ्यांबरोबर फोटो काढतात व प्रशासनावर दबाव निर्माण करतात, असाही त्यांच्यावर आरोप आहे. राज्यपाल भगत सिंह यांच्याबरोबर त्यांनी असेच फोटो काढले आहेत.

लल्लन तिवारी हे सांताक्रूझ व दादरमधील कीर्तीकर मार्केटमध्ये भाजी विकायचे. नंतर त्यांनी भाजी विकणे सोडून दिले व ते मीरा भाईंदर येथे राहायला आले. तेथे त्यांनी स्थानिकांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकवायला सुरुवात केली. त्यातून मिळणाऱ्या काळ्या पैशातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात पैसा गुंतविला. अर्थात तेथेही नियमबाह्य गोष्टी करूनच ते शिक्षणमाफिया बनले व आज स्वतःची ‘राहुल एज्युकेशन’ नावाची शैक्षणिक संस्था उभारली. या कामात त्यांना सुरुवातीपासून आजतागायत मोलाची साथ दिली ते सध्याचे भारतीय जनता पक्षाचे भ्रष्ट नेते कृपाशंकर सिंह व माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुरस्कार वाटण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. दिवंगत ज्येष्ठ मराठी साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या भाषेत बोलायचे झाले तर, दररोज होलसेलमध्ये शेकडो पुरस्कार वाटणारा राज्यपाल ‘हा पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही’. त्यांनी आजवर अंडरवर्ल्डशी संबंधित असणारे गुन्हेगार, बोगस पीएचडी घाऊक मालाप्रमाणे विकणारे विक्रेते, बोगस प्रॅक्टिस करणारे डॉक्टर तसेच विविध क्षेत्रांतील कुख्यात व्यक्ती यानांही पुरस्कार दिले आहेत व पुढेही देणार आहेत. या कार्यात त्यांना मोलाची साथ दिली आहे ती त्यांच्या सचिवाने. हा सचिव म्हणजेच उल्हास मुणगेकर, राज्यपाल कोश्यारी यांनी त्याला का बेकायदेशीरपणे बसवला आहे, ते ‘गुपित’ आजवर कोणालाही समजले नाही.

लल्लन तिवारी नावाच्या शिक्षणमाफियानेही ‘कोरोना योद्धा सन्मान’ नावाचा सोहळा आयोजित केला होता. राजभवन येथे झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी उपस्थित होते. यावेळी कोश्यारी व लल्लन तिवारी यांच्या हस्ते शेकडो जणांना खिरापतीसारखा कोरोना योद्धा सन्मान हा पुरस्कार वाटण्यात आला, अर्थात याही कामात त्यांना साथ दिली ते कृपा शंकर सिंह व मुणगेकर यांनी.

राज्यपाल भगत सिंह यांच्यासमवेत लल्लन तिवारी व कृपाशंकर सिंह