उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धुरंधर नेते आहेत. दोघांमध्ये अनेक बाबतीत कमालीचे साम्य आहे. दोघेही प्रचंड महत्वाकांक्षी व पंतप्रधान पदाच्या शर्यतीतले उमेदवार आहेत. दोघेही वर्कोहोलिक, मुत्सुद्दी व तितकेच आक्रमक आहेत. राजकारणातील कोणतेही काम फत्ते करण्यासाठी जी जिगर किंवा रिस्क घेण्याची प्रवृत्ती असते, ती दोघांकडेही आहे. समोरच्याला माफ न करण्याची दोघांची प्रवृत्ती आहे. मात्र, हे साम्य येथे संपते.

फडणवीस हे टिपीकल संघाच्या परंपरेतील, संस्कारी पांढरपेशी नेते आहेत तर अमित शाह या नावाची आज राष्ट्रीय राजकारणात दहशत आहे, धाक आहे. आपल्याला हवे ते मिळविल्याशिवाय ते शांत होत नाहीत आणि आपल्या मार्गात येणाऱ्या कुठल्याही काट्याचा येनकेन प्रकारे नायनाट करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. यातूनच केंद्रात गृहमंत्री होण्याअगोदर काही काळ ‘तडीपार’ होण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

देवेंद्र हे अभ्यासू राजकारणी आहेत. मात्र, कुटील डावपेच खेळण्यात तेही माहीर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना सुरुवातीपासूनच पाठींबा आहे. फडणवीस हे शहा यांच्या तुलनेने तरुण आहेत व फिजिकली अधिक फिट आहेत. आज ते महाराष्ट्राच्या राजकारणात गुंतल्याचे दिसत असले तरी त्यांची नजर पंतप्रधान पदावर आहे.

यातूनच या दोघांमध्ये छुपा संघर्ष आहे. अमित शहा यांना राष्ट्रीय राजकारणात मोदींनंतर दुसरा स्पर्धक नको आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्रीपद घ्यायला भाग पाडले. एकप्रकारे फडणवीस यांचे पंख कापण्यास केलेली ही सुरुवात आहे. या दोघांमधून विस्तवही जात नाही, असे म्हटले जाते. यासंबंधी अनेक वेळेला ‘ स्प्राऊट्स’मधून बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

फडणवीस यांचा शहा यांनी अपमान केल्यामुळे विशेषतः नवहिंदुत्ववादी खवळून उठले आहेत. महाराष्ट्रातील संघ परिवार व ब्राह्मण संघटनांनी त्यांचा राग उघडपणे व्यक्तही केला आहे. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या कथित ४० आमदारांना शिवसेनेतून फोडून नवीन सरकार स्थापन करण्याच्या कामगिरीत फडणवीस व त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. 

 एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र हे ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे नव्हते, सरकार स्थापन करणे हे त्यांना स्वप्नातही शक्य नव्हते. मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात साकार केले फडणवीस व त्यांच्या टीमने. अर्थात कामगिरी फत्ते झाल्यावर शहा यांनी त्यांना दूर लोटले. त्यामुळे फडणवीस अक्षरश: ढसाढसा रडले. मात्र ते प्रचंड चिवट व जिद्दी राजकारणी आहेत. त्यांना काही काळ ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेतून शांत राहावे लागणार आहे. दुसरा ठोस पर्यायही त्यांच्याकडे शिल्लक नाही. मात्र सावज रेंजमध्ये आल्यावर आल्यावर हाच देवेंद्र त्यांच्या विरोधकांना रडवूही शकतो, हा त्यांचा स्वभावगुण आहे.

दोघांचे भांडण…
फडणवीस यांना शह देण्यासाठी अमित शहा कदाचित शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतून सहकार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात फडणवीसांना एकछत्री अंमल मिळू नये यासाठी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यात्याने हे घडू शकते. राजकारणात काहीही अशक्य नसते. यदाकदाचित पोटनिवडणूक लागली तर शिवसेनेला प्रचंड सहानभूती मिळू शकते, त्यात अमित शहासारख्या भाजपच्या धुरंधर नेत्याचा आतून पाठिंबा व महाविकास आघाडी एकत्र आली, तर महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटाचे (तोपर्यंत अस्तित्वात असल्यास ) अस्तित्वच धोक्यात येवू शकते. त्यातून फडणवीस यांनी उभ्या केलेल्या राजकारणाला शह बसून त्यांची प्रतिमा धूसर होऊ शकते. अर्थात ही केवळ एक शक्यता आहे.

 सध्याच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील नकार, अपमान आजच्या घडीला फडणवीस शांतपणे पचवतील, अशी शक्यता अधिक आहे. तसे न केल्यास इतर पक्षातील नेत्यांसारखीच त्यांच्या मागेही सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लागू शकतो. मोदी – शहा हे मोस्ट प्रॅक्टिकल राजकारणी आहेत. ते त्यांच्या मार्गातील कोणताच धोका शिल्लक ठेवत नाहीत, हा इतिहास आहे.