उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

‘फडणवीस है तो मुमकिन है’, हा लेख ‘स्प्राऊट्स’मध्ये १८ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाला. या अंकात लिहिल्याप्रमाणे फडणवीस यांनी विधानपरिषदेतही बाजी मारली. फडणवीस यांच्याकडे धाडस, काम करण्याची तडफ, मुत्सद्दीपणा, कपटबुद्धी व राजकारणातली परिपक्वता आहे. खऱ्या अर्थाने फडणवीस हे महाराष्ट्रातील अमित शाह आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केला, मात्र ते सरकार तात्काळ कोसळले. आता मात्र या मागील चुकीची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी फडणवीस हे अधिक सावधगिरीने पावले टाकीत आहे.

फडणवीस व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सध्याच्या हालचालीवरून एक गोष्ट निश्चित आहे की, महाराष्ट्र्रातील ठाकरे सरकार पडेल व त्याजागी भाजप शिवसेनेतील या फुटीर आमदारांना घेवून नव्याने सरकार स्थापन करेल. फडणवीस मुख्यमंत्री होतील व शिंदे उपमुख्यमंत्री. मात्र जर तात्काळ पोटनिवडणूक लागली किंवा अडीच वर्षानंतर निवडणूक लागणार आहे, तेव्हा या शिवसेनेच्या फुटीर आमदारांना निवडून येणे तितकेसे सोपे नाही.

ठाणे व शिवसेना हे समीकरण आजतरी अभेद्य आहे. ठाण्यातील शिवसैनिक शिवसेनेवर प्रेम करणारा आहे, शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंवर प्रेम करणारा आहे. मात्र ‘गद्दार एकनाथ शिंदें’वर प्रेम करणारा नाही. त्यामुळे शिवसेनेतील फुटीर आमदारांनाच काय पण दस्तरखुद्द एकनाथ शिंदे व त्यांच्या मुलालाही ठाण्यातून निवडणून येणे तितकेसे सोपे नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता गोळा केली. याचे निमित्त करीत भाजपने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तपास यंत्रणांना कामाला लावले. जाधव यांच्या घर व ऑफिसवर धाडी टाकल्या. त्यांना जेरीस आणले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने ही खेळी खेळली. त्यामुळे यशवंत जाधव स्वतःच्या बेनामी मालमत्तेचे शुद्धीकरण करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी भाजपमध्ये त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव व मुलासह प्रवेश करणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती स्प्राऊट्सने १८ जूनच्या अंकात दिली होती.

शिवसेनेच्या बेफिकीर वरिष्ठ नेत्यांनी या इशाऱ्याकडेही कानाडोळा केला. एकनाथ शिंदे हे इतर आमदारांसह सोमवारी रात्री सुरतला रवाना झाले. मात्र त्यानंतरही जाधव यांची कोणी समजूत काढली नाही. अखेर मंगळवारी दुपारी आमदार यामिनी जाधव सुरतला रवाना झाल्या, तेथून त्या इतर आमदारांसह बुधवारी रात्री गुवाहाटी येथे गेल्या आहेत.

एकनाथ शिंदे सोमवारी रात्री १०. ३० वाजता इतर आमदारांसह गुजरातमधील सुरतकडे बाय रोड रवाना झाले, त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पोलिसांचा ताफाही दिमतीला होते. मग याचा सुगावा महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला का लागला नाही, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या षडयंत्राला मूकसंमती आहे, हे अद्यापही कोडेच आहे.