लाखो रुग्णांच्या जीविताला धोका

 

पुण्यातील ‘Ace रेमिडीस’ कंपनीचा हिडीस प्रकार

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

कोणत्याही औषधांचे पेटंट मिळवताना क्लिनिकल ट्रायल दयावी लागते. ही ट्रायल देताना बहुतांशी कंपन्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासतात व त्यातूनच चुकीची औषधे रुग्णांच्या माथी मारली जातात, त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. अशा अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे केल्या जातात, मात्र आयुक्त यावर कोणतीही कारवाई करत नाही, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

सध्या ऍलोपॅथी औषधाला वाढती मागणी आहे. कोरोनानंतर ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे जवळपास बहुतेक धंदेवाईक लोकांनी ऍलोपॅथी औषधांचे उत्पादन करण्यावर भर दिलेला आहे. हे उत्पादन करताना पेटंट घेणे आवश्यक असते. हे पेटंट मिळवताना उत्पादनाची क्लिनिकल ट्रायल घेतली जाते. त्यासाठी अनेक निकष पाळावे लागतात. मात्र ६० टक्के कंपन्या हे नियम, निकष अक्षरश: धाब्यावर बसवतात. पुण्यातील Ace रेमेडीस प्रायव्हेट लिमिटेड ही यापैकीच एक. पवन कुमार गोयल हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या कंपनीने ऍलोपॅथी औषधांचे उत्पादन करताना मूळ उत्पादन सामग्रीत रेणुकीय बदल केलेला आहे. याचा विपरीत परिणाम ही औषधे घेणाऱ्या रुग्णांवर होत आहे, असा या कंपनीवर आरोप होत आहे.

या भ्रष्ट मार्गाने घेतलेल्या पेटंटने रुग्णांच्या जीवतेला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे ही पेटंट्स त्वरित रद्द करण्यात यावीत. या औषधांच्या उत्पादनांची नव्याने, प्रामाणिक व ज्येष्ठ डॉक्टरांच्या पॅनेलखाली पुन्हा क्लिनिकल ट्रायल करण्यात यावी, अशी मागणी दत्ता जाधव ( नाव बदललेले आहे ) यांनी केली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी गोयल यांना वारंवार संपर्क साधला असता, होवू शकला नाही.

” या गंभीर प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे मी वारंवार तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीररीत्या दखल घेण्यात यावी व द इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल ऍक्ट १९७० मधील तरतुदीनुसार या औषधांचे उत्पादन थांबविण्यात यावे व गोयल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. मात्र आयुक्तांचे गोयल यांच्याशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.”
दत्ता जाधव,
तक्रारदार