हॉस्पिटल बनलंय खाटीकखाना
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
मुंबईतील अंधेरी येथील ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला (बीएसईएस हॉस्पिटल ) सन २०१२ पासून नर्सिंगची परवानगी नाही. तरीही येथे न्यूरोसर्जरीसारख्या अत्यंत नाजूक व क्रिटिकल अशा शस्त्रक्रिया राजरोसपणे केल्या जातात. यात अनेकदा पेशन्ट्सचा मृत्यूही होतो. मात्र तरीही राजरोसपणे हा नियमबाह्य पद्धतीने कत्तलखाना चालू आहे. प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेचा उद्देश हा सेवाभावाचा आहे. मात्र या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसे कमावण्याचा बेकायदेशीरपणे धंदा चालू आहे.
या अध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून हा अमानुषपणे जणू माणसं मारण्याचा कत्तलखानाच चालू आहे. या बेकायदेशीर प्रकरणात पालिका, चॅरिटी कमिशन, महाराष्ट्र कौंसिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक देवाण घेवाण आहे, असे गंभीर आरोप या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत पावलेल्या पेशंट्सच्या नातेवाईकांनी पुराव्यासह केले आहेत. इतकेच नव्हे तर पेशन्ट मृत पावल्यास त्याची किडनी काढण्यात येते, असे एकाहून एक आरोप पुराव्यासह करण्यात आले. मात्र हॉस्पिटल प्रशासन या सरकारी, निमसरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींना पैसे देवून मॅनेज करतात.
या हॉस्पिटलचा ७ वा मजला बेकायदेशीर आहे, याशिवाय या हॉस्पिटलला सन २०१२ पासून अग्निशामक दलाची परवानगी नाही, असे स्प्राऊट्सने उघडकीस आणले होते, त्यानंतर ७ एप्रिलला खडबडून जागे झालेल्या अग्निशामक दलाने हॉस्पिटल प्रशासनाला यासंबंधीच्या अटींचे पूर्तता करण्याचे आदेश दिले. तशी कागदोपत्री पूर्तता हॉस्पिटलने केलीही. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी आधारभूत कागदपत्रे ही नियमानुसार नव्हती. इतकेच नव्हे तर फायर ब्रिगेडच्या नियमानुसार लागणाऱ्या नियमांची पूर्तताही करण्यात आलेली नव्हती. याशिवाय अग्निशमन करण्यासंबंधीची सिस्टीम ही अद्यापही अकार्यक्षम व इनऑपरेटिव्ह आहे. मात्र आर्थिक देवाणघेवाणीमुळे फायर ब्रिगेडने याविषयावर मौन बाळगले आहे.