उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

महाराष्ट्रातील यावल, भुसावळ व जळगाव या तीन तालुक्यांतील 11 हजार 318  हेक्टर शेतजमीन ओलिताखाली यावी व त्यामुळे हा भाग ‘सुजलाम सुफलाम’ व्हावा, या उद्देशाने ‘शेळगाव बॅरेज प्रकल्पाला’ १९९८ साली मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पावर अद्याप ३४५ कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला. मात्र २४ वर्षांत अद्यापही या धरणाचे काम अपूर्णावस्थेतच आहे. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मध्यप्रदेशात उगम असणाऱ्या व जळगाव खानदेशातून पुढे गुजरातच्या समुद्रात वाहून जाणाऱ्या तापी नदीचे पाणी अडवावे व त्यातूनच तीन तालुक्यांचा विकास व्हावा, यासाठी या प्रकल्पाचा ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेत समावेश करण्यात आला. आतापर्यंत यावर ३५४ कोटी रुपये खर्च झालेला असून सरकारकडे आणखी ६० कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे.

” सन २००९ साली या प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी मी सातत्याने वारंवार पाठपुरावा करीत आहे. त्याचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.”
शिरीष चौधरी,
आमदार 

“या धरण प्रकल्पाला एकूण १६ दरवाजे आहेत. यापैकी १० दरवाजांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी ६ दरवाजांचे काम अद्याप बाकी आहे. यासाठी किती वर्षे लागतील, हे अदयाप सरकारलाही ठाऊक नाही. मात्र यामध्ये हजारो शेतकरी, रहिवाशी यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.”
सुमित देशमुख
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते