उन्मेष गुजराथी
स्प्राउट्स Exclusive
सवंग प्रसिद्धी व सामाजिक बांधिलकी दाखवण्याचा ढोंगीपणा, नवभारत टाइम्स या वृत्तपत्राच्या चांगलाच अंगलट आलेला आहे. मुलांना क्राउड फंडिंगद्वारे भीक मागायला लावणे, हा गुन्हा आहे, अशी चक्क नोटीसही टाइम्स प्रशासनाला महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाने बजावलेली आहे.
नवभारत टाइम्स हे टाइम्स समुहाचे ( Bennett, Coleman and Co. Ltd, BCCL ) वृत्तपत्र आहे. या हिंदी वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीमध्ये मुलांविषयी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीमध्ये १८ वर्षांखालील मुलामुलींची छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या छायाचित्रांतील मुलामुलींच्या भविष्यासाठी सामान्य वाचकांकडून पैशाची मागणी करण्यात आलेली होती.
नवभारत टाइम्सने ‘हेल्प अ स्टार’ या गोंडस शीर्षकाखाली पैसे मागण्याची ही कथित मोहीम चालवली होती. ही मोहीम याआधीही ७ वर्षांपासून चालवण्यात येत होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यासंबंधीच्या बातम्या सलग काही दिवस नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित करण्यात येत होत्या. या बातम्यांच्या माध्यमातून वाचकांनी नवभारत टाइम्सला चेक स्वरूपात पैसे देण्याचे आवाहन केले गेले. या कथित मोहिमेद्वारे फक्त १५ मुलांना आर्थिक मदत मिळणार होती. मात्र त्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्याचे मोठ्या प्रमाणावर ब्रॅण्डिंग करण्यात येत होते. इतकेच नव्हे तर यासाठी ‘अपना सरकारी’ या बँकेला बँकिंग पार्टनर बनवण्यात आले.
नवभारत टाइम्सचे प्रशासन या कथित मोहिमेला महिनाभर प्रसिद्धी देवून स्वतःचीच पाठही थोपटून घेत होते, याशिवाय विद्यमान मंत्री उदय सामंत, बोगस डिग्रीचे माजी मंत्री विनोद तावडे,व यांसारखे आजी माजी मंत्री यांनाही या मोहिमेत सामील करण्यात आले होते. याशिवाय दिमतीला साकिब सलीम सारखे दुय्यम अभिनेते आणि फटाकड्या नट्यांचा ताफा तर नेहमीच मागेपुढे असे.
आप या राजकीय पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या मोहिमेतील कार्यक्रमाला बोलविण्यात आले, व याद्वारे वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न टाइम्स समूहातर्फे केला गेला.
पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असल्याचा संशय
या कार्यक्रमात दान केलेल्या पैशापेक्षा कितीतरी अधिक पट प्रसिद्धी मिळते, म्हणून लोकप्रतिनिधी, मंत्री व उद्योगपती या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत. या कथित मोहिमेतून अधिक पैसे गोळा करता यावेत, यासाठी टाइम्सकडून मुंबईत ठिकठिकाणी शेकडो कलेक्शन सेंटर्स उभे करण्यात आलेले होते, यातून मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार झाल्याची शक्यता असंख्य नागरिकांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्सचा वापर मराठी वाचकांकडून पैसे गोळा करण्यासाठी
नवभारत टाइम्समध्ये ज्या मुलांकरिता भीक मागण्यात आली, ती मुले उत्तर भारतीय होती. याशिवाय नवभारत टाइम्सचे सिस्टर कन्सर्न असलेले ‘महाराष्ट्र टाइम्स’ नावाचे दुसरे वृत्तपत्र आहे. यातही ही कथित मोहीम आखण्यात आलेली होती. मात्र यातील मुले ही मराठी भाषिक होती, यातूनच हे स्पष्ट होते की या वृत्तपत्रांचा उद्देश हा मुलांची मदत करणे, असा कधीच नव्हता. तर या मुलांचा वापर करून भाषा व क्षेत्राच्या आधारावर भीक मागणे, त्यात अपहार करणे व वाचकांची संख्या वाढवणे, हे सूर्यप्रकाइतके स्वच्छ आहे, असे दिसून येते.
मुलांसाठी क्राउड फंडिंगद्वारे पैसे मागणे बेकायदेशीरच
महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाने नवभारत टाइम्सला नोटीस पाठवलेली आहे. या नोटिसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, नवभारत टाइम्स प्रशासनाचा हा कथित उपक्रम हा बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम, २०१५ चे कलम २ (८) अन्वये ‘भीक मागणे’ या प्रकारात मोडतो. यामुळेच २०१५ च्या कलम ७६ अन्वये हा गुन्हा आहे.
नोटिसीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, ” जी व्यक्ती बालकास भीक मागण्यासाठी वापरेल किंवा त्याला भीक मागायला लावेल, त्या व्यक्तीस ५ वर्षांपर्यंत शिक्षा आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा होवू शकेल.
या कथित गैरप्रकाराबद्दल ‘स्प्राऊट्स’च्या प्रतिनिधीने, नवभारत टाइम्सचे संपादक सुंदर चंद्र ठाकूर व विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक शिवानंद पांडे यांना वारंवार संपर्क साधला, मात्र तो होवू शकला नाही.