अधिकाऱ्यांनी छापली खोटी बिले, लाटले कोट्यवधी रुपये
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
महाराष्ट्र सरकार दरवर्षी नर्सरीतून रोपे खरेदी करून गरजू शेतकऱ्यांना वाटतात. ही वाटप योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ( MGNREGS ) या माध्यमातून राबवली जाते. सरकार दरवर्षी या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते.
जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यात याच योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.
जालना तालुक्यातील कृषी अधिकारी राम रोडगे हा अधिकारी या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार आहे. मात्र त्याचे आर्थिक संबंध हे राज्याचे आरोग्य व पालकमंत्री राजेश टोपे यांचे स्वीय चिटणीस नारायण गावंडे यांच्याबरोबर आहे, त्यामुळेच हा घोटाळा ‘मॅनेज’ झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता दिलीप इनकर यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला. नर्सरी मालक अभय काळुंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
असा झाला घोटाळा:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, या योजनेतील काही सरकारी अधिकाऱ्यांनी नर्सरीतून जवळपास ५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची रोपे खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवले. त्यासाठी त्यांनी चक्क खोटी बिले छापून ती सरकारला सादर केली. या बिलांचे पैसेही लाटले. इतकेच नव्हे तर त्यांनी ही काल्पनिक रोपे या योजनेअंतर्गत वाटली असल्याचे कागदोपत्री दाखवले.