उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली. ही अटक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचे समजते.
डॉ. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या आयुक्त होत्या. त्यांनी महाविकास आघाडीतील बड्या राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार हे तत्कालीन विरोधी पक्ष नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, असा आरोपही त्यावेळी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तरखुद्द फडणवीस यांनी हे फोन टॅपिंगचे रेकोर्डिंग असलेला पेन ड्राइव्हही दाखवला.
या प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा नोंदवणार होते. त्यामुळे धास्तावलेल्या फडणवीस यांनी तातडीने सरकार पाडले व त्यांच्या मागे सक्तवसुली संचनालय म्हणजेच इडीचा ससेमिरा लावला, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
पांडे हे मुंबईचे पोलीस कमिशनर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कथित महाभ्रष्ट नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती, हा रागही फडणवीस व त्यांच्या कंपूच्या डोक्यात होता. त्यामुळे पांडे यांना इडी व सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्यामार्फत ‘गुंतवणे’, अपेक्षितच होते.
पांडे यांना झालेली अटक ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ( राष्ट्रीय शेअर बाजार ) झालेल्या सर्व्हर महाघोटाळ्याशी संबंधित दाखविण्यात आली. या घोटाळ्याची माहिती पांडे यांच्या कंपनीने सरकारला दिली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याविषयीचे स्पष्टीकरणही पांडे यांनी याअगोदरही दिलेले आहे. मात्र ते पुरेसे नाही. इतर महाभ्रष्ट नेत्यांप्रमाणे पांडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला असता, तर या तपास यंत्रणाची चौकशी त्वरित थांबली असती.
वास्तविक हा महाघोटाळा ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आहे. हा महाघोटाळा २०१० ते २०१५ या काळात करण्यात आला. या काळात काँग्रेस व भाजप या दोघांचीही सरकारे होती. फायनान्स मिनिस्टर, सेबीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताशिवाय हे महाघोटाळे कुणालाही करणे शक्यच नाही.
या प्रकरणातील मुख्य आरोपी एनएसई’च्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण व आनंद सुब्रमण्यम हे फक्त मोहरे आहेत. मास्टरमाइंड मात्र शेवटपर्यंत मोकाटच फिरतील, असे सद्यस्थितीवरून वाटते.
या प्रकरणात खलनायक म्हणून उभे केलेले पात्र म्हणजे चित्रा रामकृष्ण व आनंद सुब्रमण्यम यांच्या जीवाला धोका आहे. बिग बुल हर्षद मेहता यांना ठाणे येथील जेलमध्ये आलेला मृत्यू स्प्राऊट्सच्या एसआयटीला जसा संशयास्पद वाटतो, तसा संशय याप्रकरणीही वाटू लागलेला आहे.
हर्षद मेहता यांनी शेअर मार्केटमध्ये १९९२ साली केलेला महाघोटाळा त्यावेळच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार सुचेता दलाल यांनी उघडकीस आणला. त्यावेळी त्यांचे भारतातूनच नव्हे तर जगभरातून कौतुक झाले. मात्र या प्रकरणातील राकेश झुनझुनवालासारखे मुख्य मोहरे आजही मोकाट फिरत आहेत. नाण्याची दुसरी बाजू दाखवली गेलीच नाही. ज्यांनी ही भली मोठी पेड न्यूज दिली त्यांच्याविरोधात अवाक्षरही बोलले नाही. ही ‘सुपारी’ पत्रकारिता नव्हे काय?
एनएसई घोटाळ्यात सुचेता दलाल यांचीही सीबीआयने चौकशी केलेली आहे. ही चौकशी किती काळ निप:क्षपातीपणे चालेल, याबाबत शंका आहे, मात्र सखोल व प्रामाणिकपणे चौकशी झाली, तर दलाल यांनी आजपर्यंत किती ठिकाणी ‘दलाली’ केली व कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली, हे सत्य जगासमोर येईल व बडे मासे गजाआड होतील.