दररोज होतेय शेकडो रुग्णांची लूट
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स EXCLUSIVE
मुंबईतील परळ भागात वाडिया ट्रस्टचे नौरोसजी वाडिया मॅटर्निटी रुग्णालय (Nowrosjee Wadia Maternity Hospital – NWMH ) आहे. गोरगरीब गरोदर महिलांची प्रसूती सुलभ व मोफत व्हावी, याउद्देशाने हे हॉस्पिटल सुरु करण्यात आले. मात्र सध्या येथे दामदुपटीने शुल्क घेतले जात आहे. यामुळे हॉस्पिटलच्या करारामधील (indenture ) नियमांचे उल्लंघन होत आहे व या नियमबाह्य गोष्टीमुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे, अशी धक्कादायक बाब ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतून पुढे आली आहे.
१९२६ साली उद्योगपती नुसेरवानजी वाडिया (Nusserwangee Nowrosjee Wadia) यांनी वाडिया हॉस्पिटलला जागा खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये दिले होते. याशिवाय प्रसूतीसाठी आवश्यक असणारी ३ लाखांची उपकरणे देणगीदाखल ( गिफ्ट ) म्हणूनही दिले.
या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी Municipal Corporation City of Bombay (MCCB ) म्हणजेच आताची मुंबई महानगरपालिका व Governor of Bombay – GOB (आताचे महाराष्ट्र सरकार ) यांनीही प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. अशा १६ लाख रुपयांतून हे हॉस्पिटल विनामूल्य प्रसूतीसाठी उभे राहिले.
नुसेरवानजी वाडिया, तत्कालीन मुंबई महानगरपालिका (MCCB) व महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये पुढील वाटचालीसाठी करार ( indenture ) बनविण्यात आला. हा करार १८८२ च्या ‘इंडियन ट्रस्ट ऍक्ट’नुसार तयार करण्यात आले. हा करार २७ जुलै १९२६ मध्ये बनवण्यात आला असून या करारामध्ये ( indenture ) स्पष्ट नमूद करण्यात आले की, गोरगरीब महिलांना मोफत उपचार देण्यात यावेत व या हॉस्पिटलला नुसेरवानजी वाडिया यांच्या वडिलांचे म्हणजेच Nowrosjee Wadia Maternity Hospital असे नाव देण्यात यावे.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा ट्रस्ट ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’च्या अखत्यारीत चालविण्यात यावा. या ट्रस्टमध्ये ३ प्रतिनिधींची नेमणूक नुसेरवानजी वाडिया करतील. याशिवाय महाराष्ट्र राज्य, महानगरपालिका व गिरणी मालक संघटना यादेखील प्रत्येकी २ प्रतिनिधी नियुक्त करतील, अशी माहिती या करारामध्ये ( indenture ) नमूद करण्यात आलेली आहे. मात्र या करारामधील नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची धक्कादायक माहिती या कागदपत्रांतून उघडकीस आलेली आहे.