उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Analysis
आली जरी कष्टदशा अपार। न टाकती धैर्य तथापि थोर।। केला जरी पोत बळेचि खाले। ज्वाला तरी ते वरती उफाळे।।
शाळेच्या पाठ्यपुस्तकातील कवितेतील या ओळी. अर्थही साधा व तितकाच सोपा. मशाल पेटवल्यावर तिचे तोंड बळजबरीने जरी खालच्या दिशेकडे केले, तरी त्यातील ज्वाला वरतीच उफाळते. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाल्याचे समजले व ताबडतोब ही कविता आठवली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत ईडी, सीबीआय, नार्कोटीक्स ब्युरो कंट्रोल यासारख्या सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला. आता तर त्यांनी निवडणूक आयोगाचाही वापर करायला सुरुवात केली आहे.
याच निवडणूक आयोगाचा गैरवापर करून नरेंद्र मोदी सरकारने शिवसेनेला संपविण्याचा विडा उचललेला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी’शिवसेना’ हे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्हही गोठवले. त्यामुळे राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या इतर पक्षांतील कार्यकर्ते आनंदित झाले असतील, मात्र भाजपकडून त्यांची अवस्था ही यापेक्षाही भयानक होणार आहे.
नरेंद्र मोदी व अमित शाह यांची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चालू आहे, स्थानिक पक्षांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा डाव आहे, त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मात्र मशालीचे तोंड जरी खाली केले, तरी ज्वाला जशी आणखी तीव्रतेने उफाळून येते, हे विज्ञान आहे.आणि त्याचे इतिहासात दाखलेही सापडतात. पटत नसल्यास, विचारा इंदिरा गांधी, जगमोहन यांना.
अशा दडपशाहीतून नवी क्रांती जन्माला येवू शकते. उद्धव ठाकरे यांना आज प्रचंड सहानुभूती मिळत आहे. युवक वर्ग नव्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षिला जावू लागला आहे, हे नुकत्याच पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यातूनही स्पष्ट दिसून आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याचा ‘फियास्को’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच प्रसारमाध्यमांना लाखो रुपयांच्या जाहिराती दिल्या. कोट्यवधी रुपये फक्त ने आण करण्यासाठी एसटी बसेसवर उधळले. भाडोत्री गर्दी जमवली. मात्र जनमानसावर शिंदे फारसा प्रभाव टाकू शकले नाही. एकंदरीतच शिंदे यांनी घेतलेल्या दसऱ्या मेळाव्याचा फियास्को झाला.
यापुढील दसरा मेळावा होण्याच्या अगोदर पालिकेच्या निवडणूका होवून गेलेल्या असतील, शिंदे यांच्या गटाचा दारुण पराभव झालेला असेल व हा गट अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षात विलीन झालेला असेल.