उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आगामी पंतप्रधान पदासाठीचे दावेदार मानले जातात. शहा यांच्याखालोखाल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही नावे या शर्यतीत आहेत. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ‘मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण’ हा प्रश्न सध्या तरी महत्वाचा व तातडीचा नाही. मात्र राजकारणातील या शर्यतीची तयारी मागील ३ ते ४ वर्षांपासूनच चालू असल्याचे पाहायला मिळते.

हिंदू जनमानसात योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा पंतप्रधान पदासाठी योग्य मानली जाते, तसा त्यांना पाठिंबाही आहे. मात्र त्यांचेही अस्तित्व उत्तरप्रदेशाच्याबाहेर जावू न देण्याची दक्षता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतली जाते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिमा पंतप्रधान पदासाठी योग्य आहे. त्यामुळे त्यांनाही अनेकवेळेला हा त्रास जाणवत आहे. 

︎ शिवसेनेतून आतापर्यंत ४० हुन अधिक आमदारांनी बंड पुकारले आहे, तर दहा खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रत्यक्ष फोडाफोड़ीच्या राजकारणात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. एकनाथ शिंदे यांचा वकूब हा अत्यंत मर्यादित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण त्यांना जमलेही नसते. यामागे नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा ‘ईडी’च्या रूपाने पाठिंबा व फडणवीस यांची प्रत्यक्ष कलाकारी दिसून येते. 

 या फोडाफोडीनंतर शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शहा यांनी स्वतः ठरल्याप्रमाणे फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावले. आज या अपमानाला ‘फडणवीस यांचा त्याग, बलिदान’ अशा वेगवेगळी विशेषणे देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात फडणवीसांच्या वाढत्या महत्वाकांक्षेला लगाम लावण्यात आला. 

यातून एक बाब निश्चित आहे की, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, शिवराज सिंह यांसारखे नेतृत्व जेव्हा राष्ट्रीय स्तरावर जाण्याची स्वप्ने पाहते,  तेव्हा मोदी, शहा यांच्याकडून त्यांच्या करिअरला त्वरित ब्रेक लावण्यात येतो. 

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे फडणवीस चेहऱ्यावर दाखवत नसले तरी आतून नाराज आहेत, हे स्पष्ट जाणवते. आता मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते. आजमितीला या महापालिकेच्या ८२ हजार ४१० कोटींच्या फक्त ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट ) आहेत. (या तुलनेत गोवा राज्य त्याच्या निम्मेही नाही. गोवा राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प हा ४० कोटींहून अधिक नाही ). 

मागील ३० वर्षांहून आधी काळ ही महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. इथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. शिवसेना या पक्षाला आर्थिक रसदही येथूनच जाते, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे या महानगरपालिकेवर फडणवीस यांच ‘नजर’ होती. आता दस्तरखुद्द अमित शहा यांची ‘वक्रदृष्टी’ पडलेली आहे. या पालिकेतून मिळणारा मलिदा शहा यांना हवा आहे.  त्यामुळे ‘साम- दाम-  दंड- भेद’ करून ही महानगरपालिका जिंकायचीच, असा शहा यांचा डाव आहे. मात्र अद्याप या महानगरपालिकेतील किरकोळ अपवाद वगळता बहुतांशी नगरसेवक शिवसेनेतून फुटायला बिलकुल तयार नाहीत. 

मुंबईतील नगरसेवकांना फोडणे मुख्यमंत्री शिंदें यांना इतक्यात जमणार नाही, शिंदे यांची ताकद अद्याप ठाणे जिल्ह्याबाहेर नाही. यासाठी फडणवीस सारखा हुकमी एक्का हवा आहे. मात्र ते उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून नाराज आहेत. जोपर्यंत स्वतः फडणवीस या नगरसेवकांमध्ये ‘शक्ती’ देत नाही, तोपर्यंत हे नगरसेवक फुटणे अशक्य आहेत. याचा फायदा शिवसेनेला आगामी निवडणुकीत होवू शकतो. आजमितीला शिवसैनिक व सामान्य जनतेमध्ये शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभुती आहे. शहा यांनी फडणवीस यांचे ‘योग्य समाधान’ न केल्यास ते तटस्थ राहतील किंवा ठाकरे यांना आतून मदतही करतील. (राजकारणात हे शक्य आहे ) त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजप व शिंदे गटाला बहुमत मिळणे सोपे नाही.