ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना हाताशी धरून सरकारला लावला चुना
पोलीस महासंचालकांनी फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे दिले आदेश
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना हाताशी धरून माहिती व जनसंपर्क खात्याचे तत्कालीन संचालक अजय आंबेकर यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची धक्कदायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या ( एसआयटी ) हाती आली आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी मुंबईतील मारिन ड्राइव्ह पोलिसांना फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत.
अजय आंबेकर हे महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याचे माजी संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार केले आहेत. यापैकी काळ्या यादीत टाकलेल्या जाहिरात कंपन्यांच्या मदतीने त्यांनी तब्बल १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, अशी धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतून उघडकीस आलेली आहे. आंबेकर यांचे उघडकीस आलेले हे भ्रष्टाचाराचे प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे, अशी असंख्य भ्रष्टाचाराची प्रकरणे अद्यापही दडलेली आहेत, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीकडे आहे, या सर्व गैरव्यवहारांची माहिती लवकरच संबंधित विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
राकेश अडव्हर्टायझिंग प्रा. लिमिटेड व श्री. ओम अडव्हर्टायझिंग प्रा. लिमिटेड या कंपनींना एसटी महामंडळाने महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती प्रसारित करण्याचे कंत्राट दिले होते. मात्र त्यांनी या जाहिराती प्रसारित न करताच खोटी प्रमाणपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातींची बिले लाटली. त्यामुळे एसटी महामंडळाने या एजन्सीजना ‘दोषी’ ठरले व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नयेत, असे आदेश सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाला दिले.
एसटी महामंडळाच्या या आदेशाला आंबेकर यांनी केराची टोपली दाखवली. इतकेच नव्हे तर त्यांना आणखी १०० कोटी रुपयांच्या आसपास रकमेची वर्क ऑर्डर दिली. येथेही या कंपन्यांनी पूर्वीप्रमाणेच काम न करताच खोटी प्रमाणपत्रे सादर केली व सर्व रक्कम या तिघा भामट्यांनी मिळून हडप केली.
“माहिती व जनसंपर्क खात्याचे माजी संचालक अजय आंबेकर यांनी केलेल्या महाघोटाळ्याची त्वरित चौकशी करण्यात यावी व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. ”
– विकास ठाकरे
आमदार