उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी ‘ माती वाचवा’ या मोहिमेचे महत्व पटवून दिले. या दोघांनीही त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा असल्याचे सांगितले. या भेटीला अवघे २४ तास उलटत नाही, तोच शिवाजी पार्कमध्ये 400 ट्रक माती पावसात वाहून गेल्याची धक्कदायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे.

शिवाजी पार्क येथे चक्क पाणी मारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) वर्षभरासाठी १ कोटीचे टेंडर काढले आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती सर्वप्रथम स्प्राऊट्सने वाचकांसमोर आणली. त्यानंतर आता तर चक्क भर पावसात पालिकेने 400 ट्रक भरून माती टाकलेली आहे. यातील ६० टक्क्यांहून अधिक माती तात्काळ वाहूनही गेलेली आहे.

“केवळ टेंडरच्या अट्टहासापोटी जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर मूग गिळून गप्प आहे. या मातीतही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार दडलेला आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठिंबा दिलेल्या ‘माती वाचवा’ या मोहिमेचा सुरुवातीलाच बट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.”
– प्रकाश बेलवडे – पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष: गर्जना प्रतिष्ठान