‘रेलनीर’ची बाटली मिळेना
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
रेल्वेचे अधिकारी व कथित ब्रँडेड बाटलीबंद पाणी विकणाऱ्या खासगी कंपन्या यांच्यात ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत. यामुळे रेल्वेतील फलाटावर ‘रेलनीर’चे बाटलीबंद पाणी मिळत नाही व त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने महागड्या बाटलीतील पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. यामुळे रेल्वेचे अधिकारी व कथित ब्रँडेड पाणी विकणाऱ्या कंपन्या प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांची माया गोळा करीत असल्याची खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.
काही वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवाशांना स्वस्त व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मोठा गाजावाजा करीत फलाटावर १ रुपयात पाणी विकण्यास सुरुवात केला. याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र सरकारची ही योजना फार काळ टिकू धरू शकली नाही. ( इथेही रेल्वेचे अधिकारी व बाटलीबंद पाण्याच्या खासगी कंपन्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंधदिसून येतात ) त्या महागड्या मशिनरी खरेदी करताना व नंतर त्या भंगारात विकताना किती भ्रष्टाचार झाला, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यानंतर लगेचच म्हणजेच साधारण: पाच वर्षांपूर्वी रेल्वेने ‘रेलनीर’ नावाचे बाटलीबंद पाणी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर विकण्यास सुरुवात केली.
आजमितीला ‘रेलनीर’ची बाटली जवळपास मिळेनाशी झाली आहे. त्याचा फायदा घेवून काही दिवस अन्य कथित ब्रँडेड बाटलीबंद पाणी विकण्याची परवानगी आयआरसीटीने मध्य रेल्वेला दिली आहे. त्यामुळे फलाटावरील विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. रेलनीरच्या तुलनेत त्यांना या इतर कथित ब्रँडेड बाटलीबंद पाण्यावर घसघशीत कमिशन मिळते, मात्र त्यामुळे प्रवाशांना ‘रेलनीर’सारख्या स्वस्त व शुद्ध पाण्याला मुकावे लागते. पुढेमागे प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याचे कारण दाखवून ‘रेलनीर’ चे उत्पादन अधिकृतरीत्या बंदी करण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांना वारंवार संपर्क करूनही तो होवू शकला नाही.