उन्मेष गुजराथी Sprouts News Story in Public Interest; आजकाल व्यायामाचा मुहूर्त काढण्याआधी, खरेदीचा मुहूर्त काढला जातो. जॉगिंग – वॉकिंगसाठी स्नीकर्स हवेतच. अशा हौशी मंडळींना ऑनलाईन चुना लावायचे काम sneakerscop.co.in ही वेबसाईट करते. या साईटवर नाइके, आदिदास सारख्या अनेक नामवंत कंपन्यांचे स्नीकर्स ५० ते ६० टक्के डिस्काउंटला दाखवले आहेत. १२९९/- ला दोन, १७९९/- ला तीन जोडी. भाजी बाजारात गेल्यासारखे वाटते ना? पण ही स्नीकर्सची जाहिरात आहे. इंस्टाग्रामवर या कंपनीचे ७७ हजार फॉलोअर्स दिसतात. याशिवाय दैनंदिन अपडेट्स आहेत. त्यामुळे आदित्यने (तक्रारदार) विश्वास ठेवला. इंस्टाग्रामच्या लिंकवरून कंपनीची वेबसाईट बघितली. त्यातील reviews तपासले. तेही पॉझिटिव्ह होते. त्यामुळे त्याने google pay वरून पेमेंट केले. डिलिव्हरीचे वेगळे चार्जेसही भरले. पण ऑर्डर confirmation मेल आलाच नाही. दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट केला तर तो invalid दाखवतो. पत्ताही बोगसच. थोडक्यात सांगायचे म्हणजे, पैसे डुबले. ही एकट्या आदित्यची तक्रार नाही. वेगवेगळ्या कस्टमर रिव्ह्यू साईटवर या साईटविरोधात हजारो तक्रारी आहेत. काही युट्युबर्सनी सुद्धा या साईटला फ्रॉड म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर कमेंट सेक्शन बंद आहे. फॉलोअर्स ही फेक आहेत. कंपनीच्या वेबसाईटवरील reviews सेक्शन मधील स्क्रीनशॉटस् ला कुठलाही आगापिछा नाही. तरीही इन्स्टा सारख्या सोशल साईटवर जोरदार प्रमोशन सुरु आहे. इतरवेळी कन्टेन्ट सेक्युरिटीच्या गमजा मारणाऱ्या या साईटवर अशा बाबतीत फॅक्ट चेकिंगची कोणतीही सोय नाही. त्यामुळे अशा फ्रॉड वेबसाईटचे फावले आहे. दोन तीन महिने एखाद्या प्रोडक्टच्या नावाने काढायचे, आणि जास्त बोंबाबोंब झाली की ८०० रुपयाचे नवीन डोमेन नेम घ्यायचं. नवीन नाव – नवीन लोगो. वस्तूंच्या किमतीही सरासरी हजार – दोन हजाराच्या आतच ठेवायच्या. म्हणजे गंडलेले खरेदीदार पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सायबर सेल स्वतःहून दखल घेत नाही. राजकीय नेत्यांविषयी सोशल मीडियावर एक वावगा शब्द टाकून बघा, पोलीस घरी येतील. पण हजारो तक्रारी असूनही sneakerscop.co.in सारख्या कंपन्यांची दणक्यात जाहिरात सुरु आहे. इथे सायबर सेलला हप्तेखोरीमुळे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना जरा सांभाळून…