उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स विश्लेषण
एकनाथ शिंदे ठाण्यात रिक्षा चालवायचे तर गुलाबराव पाटील जळगावमधील पाळधी या खेडयात पानटपरी चालवायचे, रामदास कदम तत्कालीन आमदार केशवराव भोसले यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते… एक नाही अशी शेकडो उदाहरणे आहेत. या सर्वांवर विश्वास ठेवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सर्वांना अक्षरश: रंकाचे राव केले. या सर्व नेते व त्यांच्या नातलगांनाही लाखो शिवसैनिकांच्या मदतीने तीन- तीन, चार- चार वेळा निवडून आणले. मात्र त्यामुळे या नेत्यांनाही भलताच माज चढला. त्यांनी अक्षरश: हजारो कोट्यवधी रुपयांची काळी माया जमविली आणि नेमकी हीच बाब धूर्त देवेंद्र फडणवीस यांनी हेरली.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील या प्रमुख नेत्यांच्या मागे इडीचा ससेमिरा लावला. त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा खुबीने वापर केला. वास्तविक शिंदे व फडणवीस यांच्यातील जवळीकीची चर्चा कायमच व्हायची. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना कधीच फार जवळ येऊ दिले नाही. शिंदे केव्हाही दगाफटका करू शकतात, याची ठाकरे यांना जाणीव होती. त्यांचा वकूबही त्यांना माहित होता. मात्र भाजपच्या फडणवीसांमुळे त्यांना एवढे बळ मिळेल,याची जाणीव नव्हती.
︎ फडणवीस हा राजकारणातला हिमनग आहे. राजकीय पटलावर ते केवळ १/४ दिसतात. पण त्या पटलाखाली त्यांच्या कूटनीतीचा विस्तार ३/ ४ आहे, त्याबाबत ठाकरे यांना माहित असूनही ते गाफील राहिले, याचाच नेमका फायदा फडणवीस यांनी घेतला.
फडणवीस मागील अडीच वर्षांपासून योग्य संधीची वाट पाहत होते. मात्र सावज रेंजमध्ये येत नव्हते. शिंदेही हे धाडस करायला घाबरत होते. अखेर फडणवीस वाट बघून कंटाळले व त्यांनी अखेर त्याचे ‘इडी’रुपी ब्रह्मास्त्र बाहेर काढले. त्यांनी शिंदे यांचे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार सांभाळणारे त्यांचे सचिव सचिन जोशी यांना इडीची नोटीस पाठवली आणि हा घाव शिंदे यांच्या वर्मी बसला. शिंदे यांचा जीव सचिन जोशी यांच्यारूपी ‘पोपटा’त होता. त्यामुळे धास्तावलेल्या शिंदे यांनी वेगाने सूत्रे हलवली.
फडणवीस यांचा डाव तात्पुरता का होईना यशस्वी झाला आहे. अर्ध्याहून अधिक आमदार ईडीच्या कारवाईला घाबरले तर उर्वरित आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्याचे अमिश दाखवले गेले, अशी खात्रीलायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे. अर्थात या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी आता शड्डू ठोकून मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे हे बंड लवकरच थंड होते की आणखी पेट घेते हे लवकरच कळेल.