उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
त्यांचा विजयाचा वारू रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनीही मनावर घेतले होते. शहा यांना देवेंद्र फडणवीस हे पक्षांतर्गत शत्रू वाटतात. ( मोदी यांच्यानंतर भाजपमधील पंतप्रधान पदाचे दोघेही दावेदार आहेत. ) त्यामुळेच गोव्यातील भाजपला अशक्यप्राय वाटणारी विधानसभेतील निवडणूक, त्यांनी फडणवीस यांच्या माथी मारली. मात्र राजकारण खेळण्यासाठी लागणार मुत्सुद्दीपणा, कपटबुद्धी, दिवसरात्र मेहनत घेण्याची व प्रसंगी प्रचंड धाडस करण्याची तयारी यामुळे फडणवीसांनी गोवा जिंकून दाखवले.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत ‘साम’ दाम’ ‘दंड’ व ‘भेद’ यांचा प्रभावीरीत्या वापर केला आणि तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. अवघड वाटणारा विजय अगदी शेवटच्या क्षणी शक्य करून दाखवला. आता फडणवीस यांनी विधानपरिषदेवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळीही ‘फडणवीस है तो मुमकिन है’ हेच चित्र सध्या दिसत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुका संपल्यावर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. मुंबई महानगरपालिका ही तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. ती शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी टीम देवेंद्र मागील वर्षांपासूनच कामाला लागलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला आर्थिक रसद पुरवणारे व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी भाजपने तपास यंत्रणांमार्फत धाड टाकली. अगोदरच पक्षांतर्गत विरोधामुळे वैतागलेले जाधव या धाडीमुळे आणखीनच धास्तावलेले आहे.
जसजशी पालिकेची निवडणूक जवळ येईल, तसतसा तपास यंत्रणांचा फास अधिकच आवळला जाईल, ही फडणवीस यांची अचूक खेळी जाधव यांना ठावूक आहे. त्यामुळेच जाधव व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मुलासह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आली आहे. या प्रवेशामुळे जाधव यांच्यावरचे तपास यंत्रणांचे बालंट टळेलच व त्यांच्या बेहिशेबी, काळ्या मालमत्तेचे शुद्धीकरणही होईल.