उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
पास्टर राजकुमार येसूदासन हा मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई येथील सीवूड येथे बेकायदेशीरपणे बालवस्तीगृह चालवायचा व तेथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. हा सर्व कथित गैरप्रकार स्थानिक पोलीस प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व धर्मदाय आयुक्त यांच्या संगनमताने व्हायचा. या सर्व अधिकाऱ्यांचे मुख्य आरोपी व ट्रस्टी मंडळी यांच्याशी असलेल्या कथित ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे हे रॅकेट बिनबोभाटपणे चालवले जायचे व त्यामुळेच आजही हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न होत आहे, असे ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या ( एसआयटी ) निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रामधील नवी मुंबई भागातील सीवूड हे गाव. या गावातील एनआरआय हा पॉश एरिया. या एरियामध्ये महानगरपालिकेच्या जागेवर ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ने बेकायदेशीरपणे चर्च बांधले आहे. या चर्चच्या माध्यमातून येथे मागील ५ ते ६ वर्षांपासून बेकायदेशीरपणे बालवस्तीगृह चालवले जायचे.
पास्टर राजकुमार येसूदासन हा बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वेसर्वा आहे. हा आरोपी येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. सुरुवातीला तो या मुलींच्या अंगाला विक्स किंवा तेल लावायचा. त्यानंतर त्यांना गुंगीची गोळी देवून झोपवायचा व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. यामध्ये आतापर्यंत तीन मुलींनी तक्रार दाखल केली आहे. यापैकी एका मुलीने गर्भपात केल्याचेही निदर्शनास आले आहे.
याप्रकरणात पास्टर राजकुमार येसूदासन याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या मुलाने आरोपी राजकुमार याला अटक केल्यावर त्या कोठडीचे जबरदस्तीने शुटिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येसूदासन याच्यावर कारवाई करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल संरक्षक अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या घटनेला आज १ महिना पूर्ण झाला आहे, मात्र अद्यापही या ट्रस्टमधील बाकी संशयित ट्रस्टी मंडळी मोकाट फिरत आहे. त्यांची सखोल चौकशी केल्यास पास्टर व त्याच्या सहकारी ट्रस्टी मंडळींनी मागील ५ ते ६ वर्षांत किती मुलींवर अत्याचार केले, हे सर्व जगासमोर येईल. या बालवस्तीगृहात आलेल्या मुली हे बालवस्तीगृह तात्काळ सोडून किंवा तेथून पळून का जायच्या, हेही उघडकीस येईल.
पास्टर राजकुमार व त्याचे सहकारी ( ट्रस्टी ) मागील ५ ते ६ वर्षांपासून बेकायदेशीपणे बालवस्तीगृह चालवायचे. राजकुमार हा येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवर येऊन आता महिना उलटला आहे, मात्र अजूनही धर्मदाय आयुक्त या ट्रस्टची मान्यता रद्द करत नाही किंवा या ट्रस्टला ब्लॅक लिस्टेड म्हणून घोषित करीत नाही, यावरून या ट्रस्टचे थेट धर्मदाय आयुक्तांशी कथित ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्प्राऊट्सच्या ‘एसआयटी’शी बोलताना केला आहे .
“या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे”.
सागर चोपदार,
हिंदू जनजागृती समिती