उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

महाराष्ट्रावर आजही बाळासाहेब ठाकरे यांची मोहिनी आहे. गांधींशिवाय कांग्रेस व ठाकरेंशिवाय शिवसेना हे समीकरण भारतीय जनमानसाला मानवणारे नाही. आज बाळासाहेबांना जावून १० वर्षे झाली, मात्र त्यांच्या नावाचा करिष्मा आजही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे प्रति शिवसेना काढण्याची नौटंकी शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाहीत.

आज ईडीच्या भीतीने शिवसेनेतील बरेचशे आमदार व नेते भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले आहेत. तर ज्यांनी फार कमावले नाही त्यांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचे अमिष दाखवले जात आहे. त्यासाठी दररोज कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. हे सर्व पाहून शिवसेनेतील सच्चा शिवसैनिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील घडलेला कट्टर स्वयंसेवक भांबावलेला आहे.

संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्तीला गुरु न मानता फक्त भगव्या ध्वजाला गुरु मानतात. गुरुपौर्णिमा उत्सवाला दरवर्षी न चुकता या गुरूला गुरुदक्षिणा अर्पण करतात. अशा प्रामाणिक स्वयंसेवकाला हे सर्व न पचणारे आहे. स्वयंसेवकांमध्ये स्वच्छ चारित्र्य निर्माण करणे, ही संघाची खासियत आहे. मात्र सध्या ज्या पद्धतीने सत्ता व पैशाच्या लालसेने एकनाथ शिंदे, नारायण राणे, राम ठाकूर, प्रवीण दरेकर, यशवंत जाधव, कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड, अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे – पाटील असे एकाहून एक सरस महाभ्रष्ट पुढाऱ्यांना आयात केले जाते व आयुष्यभर पक्ष व समाजासाठी खस्ता खाणाऱ्यांना साईडलाईनला केले जाते, हे सर्व कट्टर स्वयंसेवकाला न पटणारे व तितकेच मनस्ताप देणारे आहे. संघाची स्थापना करणाऱ्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा हा अवमान आहे, ही त्यांची क्रूर थट्टा आहे.