उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स EXCLUSIVE

एलआयसी या इन्शुरन्स कंपनीवर आजही कोट्यवधी ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे, काही प्रमाणात ते सत्यही आहे, मात्र याच विश्वासाचा फायदा घेवून कंपनीने तब्बल २ कोटी ग्राहकांना चुना लावण्याची धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आली आहे.

सन २००३ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून एलआयसीने ‘जीवन सरल (With Profit ) टेबल नंबर १६५ ही पॉलिसी बाजारात आणली. २० ते ६० या वयोगटातील ग्राहकांसाठी ही पॉलिसी होती. या पॉलिसीतील माहितीपत्रकानुसार ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यांना (मॅच्युरिटी पिरीएड्स) नंतर दुप्पट रक्कम मिळणार होती. या आकर्षक दाव्याला भुलून जवळपास ५ कोटी ग्राहकांनी ही पॉलिसी खरेदी केली. यातील २ कोटी ग्राहक हे ज्येष्ठ नागरिक होते. 

ग्राहकांनी प्रीमियमची रक्कम वेळोवेळी भरली, त्यापैकी २ लाख ग्राहकांना (ज्येष्ठ नागरिक ) दुप्पट तर सोडा पण जेमतेम १/३ रक्कम हाती टेकवण्यात आली. याविषयीच्या असंख्य तक्रारी ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आल्या आहेत. यापैकी सुरेश राव सारख्या कित्येक ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांनी पंतप्रधान, अर्थमंत्री, एलआयसी, भारतीय विमा प्राधिकरण (आयआरडीए ) सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनकडे  (सीबीआय) वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.