सरकारच्या तिजोरीत चिल्लर, नेत्यांकडे मात्र घबाड
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी
भारतातील इडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या तालावर नाचत आहेत, हे आता शेंबड्या पोरालाही माहित आहे. या तपास यंत्रणांच्या इशाऱ्यावरून सर्वत्र छापेमारीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या छापेमारीतून किरकोळ निधी सरकारच्या तिजोरीत जमा होतो तर याहून कैक पटीने अधिक रक्कम भारतीय जनता पक्षाला दलालाच्या मार्फत मिळत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.
भाजपला विरोध करणाऱ्यांवर या कारवाया होत आहेत. देशातील बिझनेसमन लोकांकडून पैसे गोळा करणे व पुढाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायला लावणे, हेच जणू या तपास यंत्रणांचे काम झाले आहे. यातून अरबो रुपयांची काळी माया भाजपकडे जमा होत आहे. या पैशाचा वापर करून लोकप्रतिनिधी फोडणे, निवडणूका लढवणे, यासाठी केला जात आहे.
मोदी व शहा यांच्या कारकिर्दीत विशेषतः इडीने किती जणांना नोटीस पाठविल्या, याची माहिती अद्याप दिली जात नाही. याबाबत माहितीचा अधिकार वापरला गेला असता, ती माहितीही चक्क नाकारण्यात आली. वास्तविक हीच माहिती इडीच्या वेबसाईटवर दाखविण्यात यायला हवी होती. मात्र केंद्र सरकारने ही माहिती दडवून ठेवली आहे.
याच तपास यंत्रणांचा गैरवापर जितेंद्र नवलानी सारख्या अधिकाऱ्यांनी केला होता. व यातून अक्षरश: कोट्यवधी रुपये भाजप नेत्यांना गोळा करून दिले, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमची स्थापना करण्यात आलेली होती. या वसुली रॅकेटसंबंधी सर्वच संशयित अधिकाऱ्यांना अटक होणार होती. मात्र याआधीच महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिंदे फडणवीस म्हणजेच भाजपचे सरकार बेकायदेशीररीत्या स्थापन झाले. आणि अवघ्या काही तासातच ही चौकशी बंद करण्यात आली व पांडे यांच्यावर इडीची कारवाई करून तात्काळ अटक करण्यात आली.
भाजपच्या या केंद्रीय तपास यंत्रणांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनेही मुंबई पोलीस, महिला आयोग या यंत्रणा वापरल्या. मराठी मधील एका टिनपाट नटीला केवळ सोशल मिडीवरील पोस्ट शेअर केली म्हणून ४० दिवस तुरुंगात डांबले, असा दुरुपयोग केल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र यानिमित्ताने तपास यंत्रणांचा खुबीने वापर करून राजकारणातील शह काटशह खेळण्याचा जंगली पायंडा पडलेला आहे.
याआधी कांग्रेसनेही तपास यंत्रणाचा दुरुपयोग केला होता, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केले व पचवलेही होते. त्यामुळे जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवले. मात्र जे साठ वर्षांत काँग्रेसला जमले नाही, त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने भ्रष्टाचार व शासकीय यंत्रणाचा गैरवापर हा मोदी – शहा ही जोडगोळी भारतात करवून दाखवत आहे. मोदी – शहा यांनी भाजपमधील ‘पावित्र्य’ केव्हाच घालवलेले आहे आणि भाजपची केव्हाच ‘काँग्रेस’ करून ठेवलेली आहे.
अर्थात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आलेला नाही, त्यामुळे उद्या विरोधकही सत्तेवर बसतील. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ‘पुलवामा’ घडवून आणणे , ४० ते ५० आमदार, खासदार यांना एकाच वेळी भय अथवा अमिश दाखवून विकत घेणे व लोकशाहीला झुगारून देत सत्ता काबीज करणे, त्यांच्या भ्रष्ट कारकिर्दीला क्लीन चिट देणे, हा पायंडा भारतासारख्या सुसंस्कारित देशासाठी अत्यंत घातक आहे. आगामी काळात विरोधक याहीपेक्षा अधिक तीव्रतेने या विघातक बाबींचा वापर करतील व त्यामुळे भारत आणखी रसातळाला जाण्याची शक्यता आहे.